कोथरुडकरांनी अनुभवली महा शिवसाधना,भक्तीमय वातावरणात हजारो दाम्पत्यांकडून सामुहिक रुद्र पूजन
मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवस्व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
कोथरूड: श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असून, या महिन्यात विविध प्रकारची अनुष्ठाने आयोजित केली जातात. कोथरुडकरांना शेवटच्या श्रावण सोमवारी महा शिवसाधनेचा अनुभव घेण्याची अनुभूती मिळाली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवस्व प्रतिष्ठानच्या वतीने १००१ दाम्पत्यांकडून सामुहिक रुद्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो कोथरुडकरांनी सहभागी होऊन महा शिवसाधनेची अनुभूती घेतली.
हिंदू धर्मात रुद्र अभिषेक सोहळा हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्याच्या हेतूने, रुद्र अभिषेक सोहळा आयोजित केला जातो. या संस्कारात भाग घेतल्याने एखादी व्यक्ती आध्यात्मिक शुद्धी, आंतरिक शांतता आणि इच्छा पूर्ण करू शकते, अशी धारणा आहे. त्यामुळे शेवटच्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शिवस्व प्रतिष्ठानच्या संयोजनातून १००१ दाम्पत्यांसाठी सामुहिक रुद्र पूजनचे आयोजन करण्यात आले होते.
अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. हजारो कोथरुडकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख गोविंद गिरीजी महाराज यांचे शिष्य सुजित देशमुख आणि त्यांच्या शिष्यांनी रुद्र पठण आणि सहभागी दाम्पत्यांकडून रुद्र पूजनाचे विधी करुन घेतले. यावेळी सर्व वातावरण शिवमय झाले होते.
आपल्या संस्कृतीत श्रावण महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र श्रावण महिन्यात विविध प्रकारची धार्मिक अनुष्ठाने करून पुण्य कमावले जाते. त्यामुळे आज या अनुष्ठानाच्या माध्यमातून हजारो दाम्पत्यांनी पुण्य संचित केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मानव कल्याणासाठी या सर्वांनी आपले संचित खर्च करुन; अजून पुण्य कमवावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी परम पूज्य भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कार्यक्रमाचे संयोजक गिरीश खत्री, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. सेजल गलिंदे यांनी महिला सक्षमीकरण यांनी तसेच कृष्णा साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवतांडव आणि शिवस्तवन सादर केले.