कोथरूडमधील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात कोकणात जायला करण्यात आली मोफत बसेसची खास सोय..
पृथ्वीराज सुतार यांच्याकडून विशेष उपक्रमाचे आयोजन
कोथरूड : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कोथरुड विभागाकडून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले. कोथरुड मधील वनाज कॉर्नर येथून रत्नागिरी, लांजा, खेड, चिपळूण, महाड,पाली या भागांसाठी मोफत बस सोडण्यात आल्या. त्याचा लाभ ३०० कोकणवासीय बंधु-भगिनिंनी घेतला.
या उपक्रमाचे आयोजन पुणे मनपा शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, शिवसेनेचे विभागप्रमुख भारत सुतार, शिवसेनेचे, कोकणवासी महासंघाचे पदाधिकारी, श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ( ट्रस्ट )चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले की, कोथरुडमध्ये कोकणवासीयांचे प्रमाण मोठे आहे. गणेशोत्सव व होळीसाठी गावाला जाण्याची ओढ प्रत्येक कोकणवासीयांना असते. परंतु बस व रेल्वेचे आरक्षण मिळणे अवघड होते. त्यातच एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे गणेशोत्सवाला गावी कसे जायचे हा प्रश्न कोकणवासीयांना पडला होता. कोथरुडमध्ये मोफत बससेवेचा हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला गेला तो शिवसेनच्या माध्यमातून मला राबविता आला त्याचा मला निश्चितच अभिमान आहे. या उपक्रमास कोकणवासीय बंधु-भगिनींनी भरघोस प्रतिसाद दिला. आता आम्ही दरवर्षी ह्या उपक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी सर्वांना प्रवासासाठी व गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. कोकणवासी व शिवसेना यांचे नेहमी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे याची आठवण थरकुडे यांनी यावेळी करुन दिली. कोकणवासी महासंघाच्या वतीने पृथ्वीराज सुतार यांच्याबद्दल व शिवसेनेने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रवासात बस सेवेबरोबरच, प्रवास काळात प्रत्येक प्रवाशांसाठी नाष्टा, भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. यावेळी सर्व बस चालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांनी सहकार्य केले. प्रवासाचे व्यवस्थापन सह्याद्री कुणबी संघटना यांनी केले.
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या कोकणवासीयांना शिवसेनेच्या वतीने शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, शहराध्यक्ष गजानन थरकुडे, भारत सुतार, सह्याद्री कुणबी संघटनेचे विराज डाकवे यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधिर वरघडे, अनिल भगत, नचिकेत घुमटकर, योगेश चौधरी, जितेंद्र खुंटे,अजय डहाळे,विशाल उभे, मनोज अल्हाट, तुषार दुधाने, नवनाथ बाणेकर, निलेश मिस्त्री, गजानन हिंगे,योगेश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.