कोथरूड मधील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे धडे : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचा उपक्रम

कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छ सहकारी संस्था, कमिन्स इंडिया लि. कंपनी, जनवाणी सहकारी संस्था या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ शौचालय स्पर्धा” या अनुषंगाने परिसराची स्वच्छता, शाळेतील व सार्वजनिक स्वच्छतागृहे व कचरा वर्गीकरण या विषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनपर जनजागृती अभियान राबविण्यात आले.

प्रभाग क्रमांक १२, सरस्वती विद्या मंदिर प्रशालेत इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचा परिसर, शौचालयाची स्वच्छता, वर्गातील स्वच्छतेविषयी व ड्रमद्वारे खत प्रकल्पाची पहाणी करण्यात आली. शिवाय शालेय पोषण आहार व मुलांनी जेवण केलेल्या डब्ब्यातील उरलेले अन्न व इतर ओला कचरा शाळेतच खत प्रकल्पात जिरवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. यावेळी सरस्वती शाळेतील बंद पडलेला खतप्रकल्प कार्यान्वयीत करण्यात आला. सदर प्रकल्पात शाळेत निर्माण होणारा २५ किलो ओला कचरा व इतर पालापाचोळा जिरवण्याचे आश्वासन देण्यात आले.



मोकादम वैजीनाथ गायकवाड व स्वच्छ संस्थेचे मदतनीस सोहम खिल्लारे यांनी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा वर्गीकरणाचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाय ओला कचरा, सुका कचरा, धोकादायक कचरा आणि ई-कचरा घरामध्येच वर्गीकरण करा तसेच याविषयीचे प्रत्येक विधार्थ्यांना पत्रकही वाटण्यात आली. शिवाय ओला कचरा जिरवण्याचा प्रकल्पात जिरवल्यास शाळेच्या इमारतीचा करात ५% सवलतही मिळेल याची माहिती देखील देण्यात आली.
सदर कार्यक्रम उपायुक्त संदीप कदम, घनकचरा व्यवस्थापन, विभागीय कार्यालय २ चे उपायुक्त संतोष वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, स्वच्छचे सोहम खिलारे, माधुरी श्रीखंडे, शिवम भुजबळ, कविता मदने, सुलभा मकवान, वैशाली घरटे यांनी आयोजित केला. तसेच सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला ढेरे सहशिक्षक कैलास सरतापे, अर्चना शेडगे, हरिदास ऋषिकेश व २०० विद्यार्थी व पालक सहभागी झाले.






