‘लेक लाडकी’ योजनेनुसार १८ व्या वर्षी मुलींना मिळणार ७५ हजार

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेचे सभागृहातील सदस्यांनी बाकं वाजवून स्वागत केले.
महिलांना एसटीच्या तिकीटदरात सरसकट ५० टक्के सवलत, महिलांना मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत, आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन ३५०० आणि गटप्रवर्तकांच्या सध्याचे मानधन ४७०० रुपये आहे. यामध्ये १५०० रुपयांची वाढ केली जाणार,अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ रुपयांवर १० हजार रुपये करण्यात येणार, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ रुपयांवरुन ७२०० रुपये करण्यात येणार, अंगणवाडी मदतनीसांचे मानधन ४४२५ वरुन ५५०० करण्यात येत आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांची २० हजार रिक्त पदे भरणार. शहरी भागात नोकरदार महिलांसाठी ५० नवीन वसतीगृहे, आदी घोषणा त्यांनी केल्या आहेत.




