वारजेत सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना यश..

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत विजय मिळवला असला तरी वारजे परिसरात सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्यास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाले आहे.
वारजे माळवाडी परिसरात दोन्ही उमेदवारांकडून चांगली ताकद लावण्यात आली होती. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे या दोन्ही उमेदवारांकडून सतत पदयात्रा व सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन वारजेतील मतदारांशी संपर्क साधला जात होता. महायुती व इंडिया आघाडीचे पदाधिकारी आपापल्या उमेदवाराला वारजेतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे वारजेतून सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळणार याबाबत उत्सुकता होती.

वारजेतून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँगेस व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भागात समन्वय ठेवून काम केल्याने हे मताधिक्य मिळाल्याचे महायुतीचे पदाधिकारी सांगत आहेत.
वारजे माळवाडी मध्ये झालेल्या मतांपैकी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना २२ हजार ३२७ मते मिळाली तर इंडिया आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना १८ हजार १९८ मते मिळाली. यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना ४ हजार १२८ मतांचे मताधिक्य वारजे मधुन मिळाले आहे.






























