प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरच महापालिका निवडणुकींमधील आघाडीबाबत निर्णय : अजित पवार

पुणे : प्रभागरचना अंतिम झाल्यानंतरच महापालिका निवडणुकींमधील आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

पुणे जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत कोविड सेंटरच्या अनुषंगानं होत असलेल्या आरोपांवरही चर्चा झाली. अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांकडे भूमिका मांडली. जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. सगळी कामे पारदर्शक पद्धतीनं झाली आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा सत्कार केल्याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांच्या बेमुदत उपोषणाचा इशारा पत्राची सरकारनं दखल घेतली असून प्रधान सचिव वल्सा नायर या अण्णांना भेटणार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितले.



