कोंढवे , कोपरे, उत्तमनगर व शिवणेला मिळणार महापालिकेचे पाणी ; सचिन दोडके यांच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना पुणे महापालिकेत हस्तांतरित
वारजे : pune city कोंढवे , कोपरे, उत्तमनगर व शिवणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्लॅन्ट महानगरपालिकेत हस्तांतरित करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या विषयासाठी मंत्रालयापासून महापालिकेपर्यंत सर्व स्तरावर पाठपुरावा करत असलेल्या नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
कोंढवे , कोपरे, उत्तमनगर व शिवणे या महापालिका हद्दी लगतच्या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्लांट द्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यात अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता. नागरिकांना पुरेशा दाबाने व आवश्यक तेवढे पाणी मिळत नव्हते. महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरणातून आलेली जलवाहिनी या गावातून गेलेली असतानाही या गावांना पालिकेचे पाणी मिळत नव्हते.
या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतरही या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्लांट द्वारेच पाणीपुरवठा केला जात होता त्यामुळे नगरसेवक सचिन दोडके यांनी सातत्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्लॅन्ट महानगरपालिकेत हस्तांतरित करावा यासाठी मागणी करत होते. त्यासाठी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे ही याबाबत पाठपुरावा केला होता. मंत्री पाटील यांनीही एका बैठकीत याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. समाविष्ट गावांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे महापालिकेत हस्तांतर करण्याबाबत चे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
आज या पाठपुराव्याला यश मिळाल्याने समाधान मिळाले असल्याची भावना सचिन दोडके यांनी व्यक्त केली आहे. आता कोंढवे , कोपरे, उत्तमनगर व शिवणे या भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.




