वाहन परवाना व वाहन नोंदणी स्मार्ट कार्ड छपाई केंद्रासाठी पुण्याचे नाव वगळले ; पुणे आरटीओ कार्यालयात छपाई केंद्र सुरू करण्याची मागणी..

पुणे : आरटीओ पुणे कार्यालय देशात एक नंबरला आहे. दर महिन्याला साधारण 32000 ड्रायव्हिंग लायसन्स या कार्यालयातून दिली जातात. एका महिन्यात वीस हजार पेक्षा जास्त नवीन वाहनांची नोंदणी या कार्यालयात होते. महसुलामध्ये राज्यात आरटीओ पुणे कार्यालयाचा राज्यात एक नंबर आहे. असे असताना देशातील एक नंबर असलेल्या कार्यालयात वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड छपाई केंद्र नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड छपाई केंद्र पुणे येथे सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम करणाऱ्या जुन्या कंपनीला काळया यादीत टाकून हे काम आता कर्नाटकच्या नव्या कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी आगोदर मुंबई, पुणे नागपूर या ठिकाणी केंद्र सुरू करणार होती मात्र यातून आता पुण्याला वगळण्यात आले आहे. पुणे एवजी संभाजी नगर या ठिकाणी हे केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामुळे पुण्याला वागळण्या मागचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भेट देऊन आरटीओ पुणे येथे वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड छपाई केंद्र सुरू करावे अशी मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने करण्यात आली आहे. सदर प्रसंगी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष राजू घाटोळे महिला विभागाच्या अर्चना इरकल, राष्ट्रवादी औद्योगिक विभागाचे अध्यक्ष संतोष कपटकर, राज्याचे खजिनदार ॲड. निलेश गांगुर्डे, सुरेश देवकर आदी उपस्थित होते.
यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालय उपमुख्यमंत्री कार्यालय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील ईमेलद्वारे वरील वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड छपाई केंद्र पुण्यात करण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. या मागणीसाठी आमदार रवींद्र धंगेकर व माजी आमदार मोहन जोशी यांनी असोसिएशनच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनामध्ये उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक चालक संघटना यांचे वतीने पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात नागरिकांच्या सह्या आंदोलन देखील घेण्यात आले होते.

महाराष्ट्र मालक चालक संघटना यांच्या वतीने शितल कोठारी बारामती या जेजुरी येथे शासन आपल्या दारी अंतर्गत वरील प्रश्न उपस्थित करण्यासाठी उपस्थित होत्या. तसेच वरील सही मोहीम राबवण्यासाठी महेश शेळीमकर एकनाथ ढोले कृष्णा दाभाडे विठ्ठल मेहता यांनी विशेष प्रयत्न केले.









