कोथरूड मतदार संघामधील मुख्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक
स्वप्नील दुधाने यांनी घेतली अनिरुद्ध पावसकर यांची भेट
कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ४० फूट अर्थात १२ मीटर रुंदीच्या पुढील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तसेच नियमित होत वाहतूक समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेऊन यावर उपययोजना करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात या महत्वाच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच या मुख्य रस्त्यांवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची समस्या नित्याची झाली असून नागरिकांना मनस्ताप होऊ लागला आहे.
आज मतदारसंघातील अशा रस्त्यांची एक यादी तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून ती मनपाच्या पथ विभागाला सुपूर्द करण्यात आली. रस्त्यांची कामे त्वरित पूर्णत्वास नेणे आवश्यक असून लवकरात लवकर मनपा प्रशासनाने यावर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी स्वप्नील दुधाने यांच्या समवेत कार्यध्यक्ष जयेश मुरकुटे, युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी उपस्थित होते. या कामास लवकरात लवकर पूर्ण न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा ईशाराही यावेळी देण्यात आला.
अनिरुद्ध पावसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच रस्त्यांचे प्रश्न निवारीत करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या दूर होईल अशी अपेक्षा आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत असे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.