निरोगी सुदृढ समाज घडविण्यासाठी सुज्ञ विद्यार्थ्यांची गरज : पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर

पुणे- “निरोगी आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी सुज्ञ विद्यार्थ्यांची गरज आहे. शालेय जीवनातच व्यसनाधीनतेमुळे अनेक विद्यार्थी गुन्हेगारीसह चुकीच्या मार्गांकडे जात आहेत. शालेय जीवनात योग्य संस्कार व मार्गदर्शन मिळाल्यास सुजान आणि चांगले नागरिक घडविण्यासाठी मदत होईल असे मत येरवडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर यांनी व्यक्त केले.
येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या वतीने अग्रसेन हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी अगरवाल Charitable ट्रस्टचे अध्यक्ष राधेश्याम अगरवाल, पोलीस निरीक्षक विजय ठकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केकान, निर्भय विद्यार्थी अभियानचे संस्थापक सदस्य निखिल गायकवाड, दिलीप कुऱ्हाडे, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवशंकर संख, उपमुख्याध्यापक सूर्यकांत सजगुरु, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साटोटे उपस्थित होते.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक हेमेंद्र व राजेश सिंगल यांनी मार्गदर्शन केले. व्यसनाचे धोके, शालेय जीवनात होणारे दुष्परिणाम, मोबाईल तसेच इंटरनेटचा गैरवापर अशा अनेक विषयांसह मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची माहिती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस अधिकाऱ्यांनी वाढत्या गुन्हेगारी मध्ये वाढती व्यसनाधीनता तसेच अल्पवयीन बालकांचा समावेश रोखण्याबाबत मार्गदर्शन केले. आगामी काळात निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या वतीने येरवडा पोलिसांसोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र मार्फत विद्यार्थी तसेच पालकांसाठी जनजागृती उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत.









