गादिया इस्टेटमध्ये ट्रंकलाईनमधून गेलेल्या पाण्याच्या लाईनबाबत अधिकाऱ्यांची पाहणी ; उपाययोजनांबाबत सूचना
पाण्याच्या लाईन शिफ्ट करण्याची अल्पना वरपे यांची मागणी
कोथरूड : pune Kothrud पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनी जवळील गादिया इस्टेट भागात ट्रंकलाईनमधून पिण्याच्या पाण्याच्या लाईन गेल्या असल्याने काही ठिकाणी दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आल्याने सदर पाण्याची लाईन तातडीने शिफ्ट करण्याची मागणी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्या वतीने करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी करत योग्य उपययोजना करण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
पुणे मनपाचे मल:निस्सारण विभागाचे अधिक्षक अभियंता गोजारे यांनी सदर जागेवर संयुक्त पहाणी केली. संबधित विषय आरोग्याशी निगडीत असल्याने यावर तातडीने योग्य त्या उपाययोजना करून कामाला सुरूवात करावी अशा सूचना कर्मचाऱ्यांना त्यांनी दिल्या. यावेळी माजी नगरसेविका अल्पना वरपे, भाजपचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष गणेश वरपे, उपअभियंता वानखेडे, उपअभियंता कपटे व गादिया ईस्टेट परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १० मधील गादिया इस्टेट, नंदनवन सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी सदर भागातील सांडपाण्याची वाहतूक करणारी मुख्य ट्रंकलाईन अत्यंत दुरावस्थेत आहे. गादिया इस्टेट भागातील वसाहतीचे व इमारतीचे सांडपाणी छोट्या-मोठ्या लाईनद्वारे या मुख्य ट्रंकलाईनला जोडले गेले आहे. यामुळे मुख्य ट्रंकलाईन वारंवार चोकअप होऊन दूषित सांडपाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यामुळे या परिसरात सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरू असल्याचे अल्पना वरपे यांनी सांगितले.
वरपे म्हणाल्या आमदार भीमराव तापकीर यांनी ही येथील प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची संवाद साधून चर्चा केली होती व सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आजची पाहणी झाली. आज झालेल्या पाहणीत ट्रंकलाईनमधून गेलेल्या पाण्याच्या लाईन शिफ्ट करण्याबाबत गोजारे साहेब यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून याबाबत लवकरच काम सुरू होईल तसेच येथील ड्रेनेज लाईनच्या कमासाठीही निधी मिळावा यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.