हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी गिरीश बापट मैदानात

पुणे : प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रचारात सक्रीय नसणारे खासदार गिरीश बापट आज कसब्याच्या पोट निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. आज संध्याकाळी भाजप पदाधिकारी यांच्या मेळाव्यात बापट यांनी उपस्थिती दाखवित मार्गदर्शन केले.कसबा जिंकण्यात गिरीश बापटांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी बापट यांची भेट घेतली होती. यानंतर आज बापट प्रचार मेळाव्यात सहभागी झाले आहेत. आज मेळाव्यात बोलताना बापट म्हणाले, कसब्याची निवडणूक भाजपच जिंकणार आहे. हेमंत चांगला काम करीत आहे. निवडणूकीसाठी सर्वांनी ताकदीने काम केले पाहिजे. निवडणूक जिंकल्यानंतर मी स्वतः: हेमंत रासने यांना पेढा भरवणार आहे.
यावेळी उमेदवार हेमंत रासने, राजेश पांडे, मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर, धीरज घाटे, दीपक पोटे, राघवेंद्र मानकर उपस्थित होते.
भाजप उमेदवार हेमंत रासने म्हणाले, कसब्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून बापट कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सूचना करीत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून लोकप्रिय असलेले आमच्या पक्षाचे नेते आज सक्रीय प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यांना बोलताना त्रास होत असल्याने आजही त्यांनी लेखी स्वरूपात अनेक सूचना आम्हाला केल्या आहेत. माझा विजय निश्चित आहे. समोरील उमेदवार माझ्या जवळपास ही येण्याची शक्यता नाही.




