पुणे शहर

घरातून बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा; पुण्याच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे/कोथरूड : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आज (२५ जानेवारी) वाहतूक बदल करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. शिवाजीनगर भागातील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) शिवाजी रस्त्याकडे जाणारी जड वाहतूक (पीएमपी बस सेवा) बंद करण्यात आली आहे.

सकाळी सहानंतर रात्री गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. स. गो. बर्वे चाैकातून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस प्रिमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला चित्रपटगृहसमोरुन खुडे चौक, बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता, अलका चित्रपटगृह या मार्गाने इच्छितस्थळी जातील. पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या पीएमपी बस मंगल चित्रपटगृहामार्गे कुंभारवेस चौकातून वळून मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकमार्गे जातील.

कोथरुडकडून अप्पा बळवंत चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बस बाजीराव रस्ता, गाडगीळ पुतळा चौकातून उजवीकडे वळून कुंभारवेस चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जातील. शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

श्री गणेश जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी मानाच्या मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. मध्यभागातील वाहतुकीची परिस्थिती विचारात घेऊन शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच अन्य मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये