वडगावशेरीत गोळीबार : व्यावसायिकावर हल्ला, गाडीची नासधूस करत सोन्याची चैन,घड्याळ हिसकावले

पुणे/वडगाव शेरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचा कारवर दगडफेक करीत गळ्यातील सोन्याची चैन व घड्याळ हिसकवण्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरीत घडला आहे. या घटनेत व्यावसायिकाने स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून एक राऊंडही फायर केला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अमित हे त्यांच्या घराजवळ त्यांची कार क्रमांक (यु पी 32 एफ एक्स 7575) ने न्याती इन्चंट सोसायटी जवळून जात असताना काही मुले शेकोटी पेटवून दारू पीत बसलेले होते. या ठिकाणी या अज्ञात मुलांनी त्यांच्यासोबत वादविवाद करून त्यांना मारहाण केली. यावेळी त्यांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्या जवळील सर्विस रिव्हॉल्व्हरलमधून एक राउंड हवेत फायर केला.
ते त्यांची कार तिथेच सोडून घरी पळून गेले. थोड्यावेळाने पुन्हा कार घेण्यासाठी गेले असता त्यांना लाकडी दांडक्याने लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे चैन, हातातील घड्याळ बळजबरीने खेचून नेले. त्याची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. जखमी अमित सिंग यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच परिसरात पोलीसगस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.
