देशातील महापौरांना स्वच्छ भारत मोहिमेचा अनुभव सांगण्याची पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी

केंद्र सरकारच्या ‘न्यू अर्बन इंडिया’ परिषदेसाठी वाराणसीत पोहोचलो असून देशातील महापौरांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील महापौरांच्या परिषदेच्या निमित्ताने मला केलेल्या कामगिरीचा अनुभव सांगण्याची संधी मिळाली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
मोहोळ म्हणाले, देशातील केवळ दोन महापौरांनाच यात अनुभव सांगण्याची संधी मिळाली असून यात आपला समावेश आहे. उद्या ही परिषद वाराणसीत होत आहे. यात देशभरातील महापौरांना पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

आपण स्वच्छ भारत मिशनवर तर सुरतच्या महापौर हेमाली बोघावाला या ‘अमृत’ योजनेचे सादरीकरण करणार आहेत. आम्हा दोघांचीही निवड थेट केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केली आहे.
देशाच्या महापौरांसह केंद्रीय नगरविकास मंत्र्यांसमोर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आपण केलेल्या कामाची माहिती देण्याची संधी मिळाली, हा पुणेकरांचा सन्मान आहे. शिवाय शहर स्वच्छतेसाठी राबणाऱ्या १५ हजारांपेक्षा जास्त स्वच्छ सेवकांचे हे यश असून हा त्यांचाही सन्मान आहे.
गेली काही वर्ष कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. त्यावर आपण जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया कशी होईल, यासाठी यंत्रणा उभी करण्याकडे विशेष लक्ष दिले. याचेच सकारात्मक परिणाम म्हणून कचरा प्रक्रिया करण्यात पुणे महानगरपालिका स्वयंपूर्ण झाली आहे. असेही मोहोळ म्हणाले.



