कोथरुडमध्ये मंगळागौर कार्यक्रमात महिलांनी दिला माहेरच्या आठवणींना उजाळा…

कोथरुड : pune city, kothrud आगोटा-पागोटा, झिम पोरी झिम्मा, किस बाई किस, घागर घुमू दे आदी गीतांनी महिलांनी माहेरच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस गायत्री भागवत यांच्या वतीने सामूहिक मंगळागौर आणि खेळांच्या साथीने शहरातील महिलांनी मंगळागौरीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
पूर्वीच्या एकत्रित कुटुंब पद्धतीत नवीन सुनेला घरात मोकळेपणा मिळावा, सासर-माहेरातील अंतर कमी व्हावे आणि प्रेम, जिव्हाळा वाढावा यासाठी मंगळागौर पूजनाचे आयोजन करण्यात येत असे. यानिमित्ताने आयोजित खेळातून सासरच्या लोकांच्या स्वभावाचे आकलन व्हावे, त्यांच्याबद्दलची भीती दूर व्हावी हासुद्धा हेतू असायचा. मात्र व्यग्र दिनक्रमामुळे आता जागरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे खेळांऐवजी आता केवळ पूजापाठ करूनच मंगळागौर साजरी केली जाते. मराठी संस्कृतीतील हा प्रकार लोप पावू नये, ही बाब ओळखून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे गायत्री भागवत यांनी सांगितले.
या वेळी नऊवार साडी परिधान करून महिलांनी मोठ्या उत्साहात विविध खेळांचे सादरीकरण केले. घागर घुमू दे, बटाटेवडा-दहीवडा, दर्यावरी आमची जोडी, अडगळ पडगळ, नाच ग घुमा या पारंपरिक गीतांवर महिलांनी एकापेक्षा एक सरस नृत्ये व खेळ सादर करून उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले. नारळाच्या करवंट्या, सूप, लाटणे या घरगुती साधनांचा वापर करून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न सहभागी कलावंतांनी केला.
महिलांनी सादर केलेल्या कसरतींनी सर्वांनाच अचंबित केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा ऊमा खापरे, सिनेअभिनेत्री रश्मी पाटील , पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा अर्चना पाटील, महिला आघाडी सरचिटणीस आशा बिबवे, रेश्मा सय्यद, कांचन कुंबरे, रेखा चोंधे, वरिष्ठ सल्लागार प्रभा मटाले तसेच व प्रसाद राहुरकार,सिद्धार्थ पारेख, शुभम राहुरकर, प्रतिक यादव , क्रांती शाईवाले, नंदा नालावडे, शुभम देडगावकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उज्वला वेदपाठक यांनी केले.

मंगळागौर आपल्या समृद्ध परंपरेतील महत्त्वाचा घटक आहे. हा केवळ धार्मिक सण नाही तर यातून सामाजिक एकोपा साधला जावा, सर्व जाती-धर्मांच्या महिला एकत्र येऊन यात सहभागी होतात आणि कला सादर करतात. मंगळागौरीच्या खेळांतून स्त्रियांचे आरोग्यही उत्तम राहते. या कारणामुळे सामूहिक मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते…..



