पुणे महापालिकेचा १२,६१८.०९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर; नागरिकांसाठी महत्वाचे निर्णय….

पुणे : पुणे महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा १२,६१८.०९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात ७,०९३ कोटी महसूली उत्पन्नासाठी तर ५,५२४ कोटी भांडवली खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सादर केलेल्या ११,६०१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातील ७० टक्के निधी खर्च झाला असून, आतापर्यंत ६,५०० कोटी जमा झाले आहेत. या वर्षी महसुली उत्पन्नात वाढ होऊन ८,४०० कोटी जमा होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिकेतील प्रशासक राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही करात वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी परिमंडळ उपायुक्त स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, शहरी गरीबांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. साथरोग नियंत्रणासाठी “मेट्रोपॉलिटीन सर्व्हेलन्स युनिट” सुरू करण्यात येणार असून, यामध्ये प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील.
शहरातील पुनर्विकासाला गती देण्यासाठी एकता नगरी येथे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प हाती घेतला जाईल. तसेच, स्मशानभूमींचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या जमिनींचा किफायतशीर वापर करून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



पुण्यातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने ३३ प्रमुख रस्त्यांसाठी विशेष तरतूद केली आहे. शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी ट्राफिक सेल अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने भूसंपादनासाठी टीडीआर (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स) पर्याय प्रभावी ठरत नसल्याने २०० कोटींहून अधिक निधी मंजूर केला आहे. काही महत्त्वाच्या रस्त्यांसाठी भूसंपादन आणि कामासाठी खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे –
•मिसिंग लिंक प्रकल्पासाठी – ३३ कोटी रुपये
•भूसंपादनासाठी – १५ कोटी रुपये
•कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी – ७५ कोटी रुपये
•कामांसाठी – ५० कोटी रुपये
पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी मोठी गुंतवणूक
महापालिकेने १४१ समान पाणीपुरवठा झोनपैकी ७४ झोन पूर्ण केले असून, आतापर्यंत ६६ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पुणेकरांना समान आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
जायका प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या ११ STP पैकी ५ प्रकल्प हे पुढील वर्षभरात पूर्ण होतील, त्यामुळे शहरातील सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला गती मिळणार आहे.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वाच्या योजना
महापालिकेने आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी “अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मेडिकल कॉलेजचे बांधकाम २०२५-२६ मध्ये पूर्ण करणार आहे.
शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मनपा शाळांसाठी “सिस्टर स्कूल” योजना सुरू केली जाणार आहे. तसेच, महापालिका शाळांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी CCTV बसविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी “सिटी लायब्ररी” येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच, महंमदवाडी येथे एक भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे.
नवीन रोजगार संधी आणि नागरी सुविधा सुधारणा
महापालिका विविध विभागांमध्ये नवीन पदभरती करण्याच्या तयारीत आहे. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी IWMS (इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम) आणि “E-Office” प्रणालीचा वापर वाढवणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेत “आपत्ती व्यवस्थापन कक्ष” सुरू करण्यात येणार आहे.
स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणावर भर
महापालिकेने टाकाऊ वस्तूंवर आधारित शिल्प निर्मितीसाठी विशेष निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक वाहतुकीला गती देण्यासाठी PMP बस खरेदीसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.
नवीन गृहनिर्माण योजना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) ४,१७३ घरे माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच, मुंढवा आणि बिंदू माधव ठाकरे चौक येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प नागरिक-केंद्रित
पुणे महापालिकेचा हा अर्थसंकल्प स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुधारणा, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांवर केंद्रित असून, कोणत्याही कर वाढीशिवाय नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रशासक राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प असून, नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचा संकल्प महापालिकेने व्यक्त केला आहे.



