पुणे महापालिका निवडणूक: संभाव्य चार सदस्यीय प्रभाग रचना अशी होऊ शकते…

पुणे : पुणे महानगरपालिकेची संभाव्य प्रभाग रचनेची लोकसंख्येनुसार विधानसभा मतदारसंघ निहाय विभागणी मार्गदर्शक सूचनाप्रमाणे होऊ शकेल याचा विचार करावा. अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
केसकर म्हणाले, पुणे महापालिका निवडणुकीसाठी या संपूर्ण प्रभाग रचनेमध्ये ४० प्रभाग हे ४ सदस्यांचे होणार आहेत.तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेवटचा प्रभाग किंवा भौगोलिक दृष्ट्या ज्या ठिकाणी अडचण असेल अशा ठिकाणी २ प्रभाग हे ३ सदस्यीय होऊ शकतात.आम्ही त्यावर काम सुरू केले आहे प्राथमिक माहिती जमा करताना वरील वस्तुस्थिती लक्षात आली म्हणून राज्य सरकारच्या वतीने पुणे महापालिका प्रभाग रचना करणार आहात म्हणून हि माहिती महापालिका आयुक्तांना पाठवली आहे.

१) मुळा आणि मुठा नदीच्या वरती मनपा नवीन हद्दीसह ६,४१,०१६ लोकसंख्येनुसार यामध्ये वडगाव शेरी आणि शिरूर विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो यात १० प्रभाग ३ सदस्यांचे झाले होते आता ४ सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये एकूण ७ प्रभाग होतील.
२) मुळा नदीच्या खाली आणि मुठा नदी वरती उत्तर पश्चिम दिशेस नवीन हद्दीसह ९,०१,०३३ लोकसंख्येनुसार शिवाजीनगर कोथरूड खडकवासला मुळशी-भोर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो यात १४ प्रभाग ३ सदस्यांचे होते आता ४ सदस्यांचे १० प्रभाग होतील.
३) मुठा व मुळा नदी खाली नवीन हद्दीसह दक्षिण-पूर्व दिशेस २०,९१,३८५ लोकसंख्येनुसार यामध्ये कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर, पर्वती, खडकवासला आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा भाग येतो. यामध्ये ३ सदस्यांचे ३३ प्रभाग होत होते आता सर्वाधिक २५ प्रभाग ४ सदस्यीय संख्येचे होऊ शकतील. अशी माहिती उज्वल केसकर यांनी दिली आहे.



दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी एक आठवडा लांबणीवर गेली असून पुढच्या आठवड्यात अंदाजे 17 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. सलग चार वेळा हे प्रकरण लांबणीवर पडत गेलं आहे. आता नव्या सरन्यायाधीशांच्या पीठापुढेच हे प्रकरण आहे






