शुभकार्यातील उपस्थितीचे असणारे निर्बंध शिथिल करावेत : संदीप खर्डेकर

पुणे : pune city संपूर्ण राज्यात आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मॉल, दुकाने, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळ,बाजार, चित्रपटगृह, नाट्यगृह सगळेच खुले होत आहे. त्यामुळे आता विवाह समारंभ व अन्य शुभ कार्यासाठी उपस्थितीची मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
या संदर्भातील मागणीचे पत्र खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना दिले आहे. निर्बंध शिथिल केले जात असल्याने मुक्त वातावरणात सामान्य नागरिक श्वास घेत आहेत. कोरोनाच्या संकटातून मुक्त होत सर्वत्र नवचैतन्य संचारत आहे. अश्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एकदाच येणाऱ्या आनंदाच्या क्षणांना मात्र बंधन घालण्यात आले आहे. मग तो विवाह समारंभ असो किंवा साखरपुडा, बारसं असो वा डोहाळजेवणं, मंगळागौर यासारखे कार्यक्रम मात्र 100 किंवा 200 लोकांच्या उपस्थितीत. हे अन्यायकारक असून सर्वकाही नॉर्मल होत असताना हे उपस्थितीचे बंधन देखील शिथिल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला 100/200 ची जरी अट असली तरी कमी उपस्थितीत, कार्यालय भाड्यासह भोजनाच्या दरापर्यंत सर्वच महाग पडत आहे. तरी कोरोनाच्या त्रिसूत्रीच्या नियम पालनाचे बंधन घालून त्वरित शुभकार्यातील उपस्थिती चे हे बंधन शिथिल करावे अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.




