रशियाकडून दोन शहरात युद्धविराम

मॉस्को : रशियाने युक्रेनमधून नागरिकांसाठी बाहेर पडू देण्यासाठी युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा या शहरांमध्ये तात्पुरता अंशतः युद्धविराम घोषित केला आहे, असे वृत्त रशियाचे मीडिया आउटलेट स्पुतनिकने दिले आहे. नागरिकांना शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करून देण्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. रशियानं युक्रेनियन नागरिकांना आपलं शहर सोडण्याचं आवाहन केलं आहे. युक्रेनमधील महत्वाचं शहर असलेल्या मारियुपोलमध्ये रशियन सैन्याने नाकेबंदी केल्याची माहिती तिथल्या महापौरांनी दिली आहे.

रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावाही युक्रेनने केला होता. आठवड्याभरात युक्रेनमधून 10 लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. दरम्यान यूक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेला एमबीबीएसचा विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत, याप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही बोललो, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. युक्रेनकडून रशियावर निर्बंध घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी सिंगापूरच्या रशियन सेंट्रल बँक आणि इतर काही रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. सोबतच, युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यावरून रशियाला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करत डिजिटल पेमेंट कंपनी पेपाल (PayPal) होल्डिंग्स इंकनं रशियातील आपली सेवा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत, रशियावर निर्बंध घालणाऱ्या विविध आर्थिक आणि तंत्रज्ञान कंपन्यांत आता PayPal चा समावेश झालाय. या अगोदर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगसहीत Appal आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांनीही रशियात आपल्या उत्पादनांची विक्री आणि सेवा रोखल्या आहेत.






