फोन टॅपिंग पॅटर्न देशभरात : संजय राऊत

मुंबई : राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा या माध्यमातून राजकारण केलं जात आहे.आजही माझे फोन आताही टॅप केले जात आहेत, पण मी माझा फोन नंबर बदललेला नाही, फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न हा देशभर राबवला जात असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी गोव्यातील नेते सुधीन ढवळीकर यांचा संदर्भही दिला आहे.

एखाद्या राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा या माध्यमातून राजकारण केलं जातं. एवढं करुनही सत्ता येत नसेल तर KGB, CIA या यंत्रणांना आणावे लागेल अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. गोव्यातील नेते सुधीन ढवळीकर यांचा संदर्भ देत ते म्हणाले, “ढवळीकर यांनी म्हंटलं की आमचे फोन टॅप होत आहे. मी त्यांना म्हंटले हे सगळीकडे होत आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. याचे जे प्रमुख होते ते गोव्यातही प्रमुख होते, ” अशी टीका संजय राऊत यांनी केली.



मुंबईत अजिबात दहशतवाद नाहीये, ठाकरे सरकार आल्यापासून हे नाहीये, विरोधी पक्षाने कितीही प्रयत्न केलाय तरी ते होणार नाही. विरोधी पक्षाला ठाकरे सरकार काम करून द्यायचे नाही, ठाकरे सरकारला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत असंही राऊत म्हणाले. दरम्यान वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेत बंडगार्डन पोलिसांनी अधिनियम कलम 26 अनुसार 26 फेब्रुवारी 2022 ला फोन टॅपिंगचा दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत.






