शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये केळेवाडीतील सानिका भंडारी हिची धमाकेदार कामगिरी… माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केला सत्कार

आपल्या भागातील मुलं जेव्हा अशी दैदिप्यमान कामगिरी करतात तेव्हा मनाला समाधान मिळते : दीपक मानकर
कोथरूड: केळेवाडी मध्ये राहणाऱ्या कु. सानिका भंडारी हिने दिनांक 27 ते 29 जानेवारी दरम्यान बारामती येथे पार पडलेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले. या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी सानिका हिचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सानिका ही खेळाडू चॅम्पियन कराटे क्लब, वसुधा फाउंडेशन हॉल, केळेवाडी येथे प्रशिक्षण घेते. यासाठी तिला मुख्य प्रशिक्षक शुभम बने आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रसाद वाघमारे, साक्षी तांदळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रभागाचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी सानिकाला स्पर्धेच्या तयारी पासून ते स्पर्धेत खेळण्यापर्यंत योग्य मार्गदर्शन केले तसेच वेळोवेळी सहकार्य केले, असे प्रशिक्षक शुभम बने यांनी सांगितले.
दीपक मानकर म्हणाले, आपल्या भागातील मुल जेव्हा अशी दैदिप्यमान कामगिरी करतात तेव्हा मनाला समाधान मिळते. प्रभागातील मुलांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जावे यासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली आहे. नगरसेवक हर्षवर्धन मानकर ही तीच भूमिका बजावत आहेत. वस्ती विभागात राहून मुल जेव्हा आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतात तेव्हा त्यात खरा आनंद मिळतो.




