तातडीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा..अधिकाऱ्यांना सूचना द्या ; नगरसेविका अल्पना वरपे यांनी घेतली मुख्य अभियंत्यांची भेट

धरणात पुरेसा पाणी साठी उपलब्ध असताना नियोजन नसल्यानेच कृत्रिम पाणी टंचाई : अल्पना वरपे यांचा आरोप
कोथरूड : कोथरूड मधील भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, डी.पी. रोड कोथरूड, वूड्स रॉयल, महात्मा सोसायटी व बावधन खुर्द, बावधन बुद्रुक परिसरात गेले अनेक महिन्यांपासून कमी प्रमाणात व खूप कमी दाबाने होत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे तातडीने या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेविका अल्पना वरपे यांनी केल्या आहेत.
अल्पना वरपे यांनी या संदर्भात महापालिकेत पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेत अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास त्यांच्या समोर मांडला. तसेच त्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

अल्पना वरपे म्हणाल्या, शास्त्रीनगर सारख्या परिसरांमध्ये नोकरदार वर्ग व कष्टकरी महिला राहतात. त्यांना सकाळी लवकर कामासाठी घरा बाहेर पडावे लागते. पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सोसायटी भागातील नागरिकांना ही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बिकट होत चालली आहे. या बाबत सखोल माहिती घेतली असता या भागाला पुरवठा होत असलेल्या चांदणी चौक टाकीची रोज येणाऱ्या पाण्याची लेवल पूर्वी पेक्षा 2 मीटरने कमी झाली आहे. त्याचा परिणाम प्रेशरवर व पाणीपुरवठ्यावर होत आहे. पंपिंगची वेळ वाढवल्यास पाणी प्रश्न निश्चितच सुटेल असे जाणवते.
देखभाल दुरुस्ती कारणास्तव जेव्हा पाणी नसते (गुरवार), त्या नंतर 2-3 दिवस ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या वेळी टँकरचा पुरवठा देखील वेळेत होत नाही. पाणी पुरवठ्याचे चुकीचे व्यवस्थापन व नियोजन तसेच अधिकाऱ्यांच्या दिरंगाईपणामुळे लाखो नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे, धरणात पुरेसा पाणी साठी उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजन नसल्यानेच हि कृत्रिम पाणी टंचाई उद्भवली आहे. असे माझे ठाम मत आहे.
पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी आम्ही केलेली आहे त्याची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी वरील भागातील नागरिकांना पाणीपुरवठा पुरेशा दाबाने पुरेशा प्रमाणात करण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले असल्याचे वरपे यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप आणि भाजपा खडकवासला पश्चिम मंडल अध्यक्ष ॲड. गणेश वरपे उपस्थित होते.






