महाराष्ट्र बाकी आहे असं म्हणत असाल तर महाराष्ट्र तयार आहे : शरद पवार

पुणे : महाराष्ट्र बाकी आहे असं म्हणत असाल तर महाराष्ट्र तयार आहे. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपला पर्याय देण्याबाबत चर्चा करु अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर दिली आहे.
‘यूपी किंवा इतर राज्यांतील निकालामुळं महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. ‘हा निकाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष अधिक जबाबदारीनं कष्ट घेतील, असंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळं राज्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडी वाढतील असं वाटतं का, असंही पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, ‘तो कार्यक्रम सुरूच आहे. त्याला तोंड द्यावं लागणार आहे. पण हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपसाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. दिल्लीतल्या कामामुळे आपचा पंजाबमध्ये विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारलं. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाल्याचंही शरद पवार म्हणाले. लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले आहेत. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपला पर्याय देण्याबाबत चर्चा करु असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
पंजाब सोडून बाकीच्या राज्यांमध्ये लोकांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. “पंजाबमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. पण तिथे तीन चार महिन्यांमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाचा स्वीकार पंजाबच्या जनतेने केला नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून काँग्रेसची चूक झाली, असे मतही पवारांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही. ते उत्तर प्रदेशात एकटे लढले आहेत. तिथे, जी मत त्यांना पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाचा स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असं शरद पवार म्हणाले आहेत.




