पुणे : राजकारणात काही व्यक्ती एरवी सामान्य वाटतात. पण, वरीष्ठ नेत्याच्या अतिशय विश्वासातल्या, मर्जीतल्या असतात. नेता आणि कार्यकर्ता असं ते अनोखं नातं असतं. शरद पवार आणि रामभाऊ गणपुले यांचे असेच अनोखे, अतूट नाते होते. रामभाऊ गणपुले हे गाडीखान्याजवळील वृत्तपत्र विक्रेते. वृत्तपत्र, मासिकं यांनी खच्चून भरलेला अगदी छोटा स्टॉल होता त्यांचा. तो स्टॉल राजकीय चर्चांचे केंद्र होता.
शिवाजीभाई ढमढेरे हे मोठे नेते होते आणि गणपुले त्यांचे निस्सीम चाहते होते. पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये शिवाजीभाई असल्याने रामभाऊंचा समावेशही त्या वर्तुळात झाला आणि गणपुलेंना महापालिकेची उमेदवारी मिळाली.गणपुले यांना १९८५च्या सुमारास महापालिकेसाठी उमेदवारी मिळाली.
गाडीखाना दवाखाना, फडगेट पोलीस चौकी आणि त्याच्या आसपासचा भाग हा गणपुलेंचा वॉर्ड होता. उमेदवारी मिळाली तरी रामभाऊ अस्वस्थ होते. निवडणूक सोपी नव्हती. त्यावेळी प्रचाराच्या काळात शरद पवार यांची मंडईत सभा होती. सभेनंतर पवारांनी गणपुलेंची विचारपूस केली. गणपुलेंनी आपली अस्वस्थता बोलून दाखविली आणि साहेब तुम्ही एकदा माझ्या वॉर्डांत चला अशी विनंती केली. पवारांना परिस्थिती लगेच लक्षात आली. ते रामभाऊंना चला म्हणाले.
पवारसाहेब आपल्या प्रभागात येत आहेत म्हटल्यावर गणपुले, शिवाजीभाई दोघेही खूष झाले त्यांनी वॉर्डांत पदयात्रा केली. साहेबांच्या पदयात्रेमुळे वातावरण बदलले, गणपुलेंना मानसिक बळ मिळाले आणि निवडणूक सोपी झाली. पवारसाहेबांनी पुढे रामभाऊंना स्थायी समितीचे अध्यक्षही केलं.
गणपुले आणि शरद पवार यांचे दृढ संबंध अजित पवार यांनाही चांगले माहीत होते. एकदा उमेदवारीसाठी गणपुलेंनी अजित पवारांची भेट घेतली तेव्हा अजित पवार म्हणाले, रामभाऊ कशाला माझ्याकडे फेलपाटे मारताय? तुमची उमेदवारी साहेबच ठरवणार आहेत. रामभाऊ गणपुले यांच्यावर असलेली साहेबांची मर्जी लक्षात घेऊन अजित पवारांनी गणपुले यांना शासकीय कामात खूप मदत केली. पवारांपेक्षाही वयाने जे मोठे कार्यकर्ते होते त्यात एक गणपुले होते. अखेरपर्यंत त्यांनी पवारांवरची निष्ठा ढळू दिली नाही. एक सामान्य कार्यकर्ता आणि नेता यांच्या संबंधांचे क्वचित आढळणारे हे उदाहरण आहे.
राजेंद्र पंढरपुरे
(जेष्ठ पत्रकार,राजकिय विश्लेषक)
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से https://www.sinhasannews.com/chakra-for-the-blessings-of-the-astrologer-maharaj-8683/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/