पुणे शहर
धक्कादायक प्रकार: पुण्यात पीएमपीएमएलची बस चोरीला

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात पीएमपीएमएल (PMPML)ची बस चोरीला गेली आहे. पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्यानं पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती. बसमध्ये चावी असल्याचं पाहून चोरट्यानं चक्क बस पळवून नेली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बस चोरी केल्यानंतर चोरटा बस मार्केट यार्ड परिसरात सोडून पसार झाला. बस चोरल्यानंतर चोरट्यानं बसमधील 5 हजारांची बॅटरी चोरून नेल्याचं उघडकीस आले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.







