कोरोना प्रतिबंधक लसीचा तातडीने पुरवठा करा अन्यथा आंदोलनाचा शिवसेनेचा पुन्हा इशारा

पुणे : सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखील इतर राज्यापेक्षा अधिक झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस महाराष्ट्रामधे पुणे शहरातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत आहे. परंतु लसीचे वाटपावर नियंत्रण केंद्र सरकारचे असल्यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक देण्यात येत आहे. तरी केंद्र सरकारकडून तातडीने महाराष्ट्राला आवश्यक लसीचा पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शाम देशपांडे, अभय वाघमारे यांनी जिलहाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा केला जात आहे. राज्यातील रूग्णांची आकडेवारी लक्षात घेता केंद्राकडून मिळणार्या लसीचे प्रमाण खूप कमी आहे. महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४.७५ लाख असताना आठवड्याला फक्त साडेसात लाख लसीचे डोस का ? केंद्र सरकारचे असे धोरण असावे कि ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण आहे व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशा राज्यांना जास्त लस देण्यात यावी. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आणि महाराष्ट्राला इतर राज्यापेक्षा लशीची जास्त आवश्यकता असतानाही महाराष्ट्राच्या हक्काची लस देण्यात येत नाही. त्याउलट लस परदेशात निर्यात करण्यात येत आहे व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रामध्ये लसीचा लॉस मोठ्या प्रमाणात आहे, अशी खोटी माहिती दिली जात आहे. लसीचे लाॅस प्रमाण भाजपच्या उत्तर प्रदेश ९.४ टक्के, कर्नाटकात ७ टक्के असून महाराष्ट्रात केवळ 3.2 टक्के आहे.

पंतप्रधान म्हणतात वेगाने लसीकरण करा परंतू राज्यामधे पुरवठ्या अभावी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान लस उत्सव करण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांनी जाहिर केला, परंतू महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असताना उत्सव कसा करणार ? याचे उत्तर केंद्राच्या वतीने कोणीही देत नाही. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील लसीकरण मोहीम पुरवठ्या अभावी थांबली गेली. महाराष्ट्राच्या जखमेवरती मीठ चोळण्याचे काम होत आहे. ईतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लस पुरवली जात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये होत असलेले कोरोना संक्रमण हे मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच मृत्युचे प्रमाण जास्त असून देखील लस पुरवठा होत नाही. महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित व्हावे, असा केंद्र सरकारचा विचार आहे का ? असे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक विचार करत आहेत. कोरोनाची राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता, या स्थितीला धैर्याने व एकत्रितपणे कुठलेही राजकारण न करता सामोरे जाणे आवश्यक आहे.



पुणे शहर व जिल्ह्यातील लसींचा साठा संपत आला आहे. १५० लसीकरण केंद्रे लसीअभावी बंद करण्यात आली. तर इतर ठिकाणच्या केंद्रावर निम्म्याच नागरीकांना लस मिळाली. नागरीकांना नोंदणी केली असतानाही पुरवठ्याअभावी परत जावे लागले. पुणे शहरात अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे फलक नागरीकांना बघून परतावे लागले. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याने लसीचा जास्तीचा कोटा देण्यात यावा. आणि संपूर्ण महाराष्ट्राला कुठलाही दुजाभाव न ठेवता लशीचा जास्तीत जास्त पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात ईच्छा नसतानाही नागरीकांच्या आरोग्याच्या हितासाठी पुण्यामधे एक मोठे जनआंदोलन उभे राहिल. याची केंद्र सरकारने नोंद घ्यावी. असा इशाराही देण्यात आला आहे.



