शिंदे गटाच्या आमदाराचं सुप्रिया सुळेंकडून जाहीर कौतुक

मुंबई : आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यासारखे प्रकार सुरुच राहिल्यास यांचे परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील, असं म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संजय गायकवाड यांनी ठाम भूमिका मांडल्यानं त्याचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाबाबत आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही.
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात नफा-नुकसान विसरुन ठामपणे उभा राहण्याची हिंमत दाखविण्याचे काम आमदार गायकवाड यांनी केले आहे, याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे अभिनंदन करतो.
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात पक्ष, गट-तट आदी विसरुन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आमदार संजयजी गायकवाड यांनी ते धाडस दाखवले याबद्दल त्यांचे मनापासून आभार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संजय गायकवाड काय म्हणाले
संजय गायकवाड म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वक्तव्य केलं. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला आहे. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी तीनदा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज जुने झाल्याचं ते म्हणाले. पण, शिवविचार कधीच जुना होत नाही आणि महाराजांची जगातील इतर कोणत्याही महापुरुषासोबत तुलना होऊ शकत नाही. राज्यपालांनी तीनदा अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं त्यांना राज्यपाल पदावरुन घालवायला हवं,असं गायकवाड म्हणाले. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात वक्तव्य करणाऱ्या सुधांशू त्रिवेदी यांच्या मुद्यावरुन देखील खडे बोल सुनावले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात कधीही माफीनाम्याचा विचार देखील केला नाही.
हे प्रकार असेच सुरु राहिले तर याचा परिणाम भाजप आणि आम्हाला देखील भोगावा लागेल, असं संजय गायकवाड म्हणाले होते. संजय गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं आहे.



