आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना संरक्षण देण्याची सुप्रिया सुळे यांची पोलिसांकडे मागणी.. नेमकं काय घडलय..

पुणे : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
या संदर्भातील पत्र सुळे यांनी पोलीस अधिक्षक,
पुणे ग्रामीण यांना दिले आहे. सुळे यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत.
परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे.

आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना
आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.









