पुणे महापालिका रुग्णालयांमध्ये लिफ्टमन अभावी रुग्णांचे हाल ; तातडीने नेमणुका करा अन्यथा आंदोलन : पृथ्वीराज सुतार

पुणे : पुणे मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलच्या इमारती बहुमजली आहेत म्हणून त्याठिकाणी रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत. या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले जात होते. मात्र आता लिफ्टमन नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी लिफ्टमनची त्वरित नेमणूक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
सुतार यांनी सांगितले की, पुणे मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रूग्ण येत असतात, त्यातील जास्तीत जास्त रूग्ण हे झोपडपट्टी व वस्ती भागातील असतात. या हॉस्पिटलच्या इमारती बहुमजली आहेत म्हणून रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत व त्या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले आहेत. या लिफ्टमनमुळे रुग्णांचे जाणे-येणे सोयीचे होते, परंतु आता महापालिकेच्या विद्युत विभागाने लिफ्टमनची आवश्यकता नाही, रूग्ण लिफ्ट चालवतील, लिफ्टमनचे टेंडर काढणार नाही असा फतवा काढला आहे.

आता हॉस्पिटलामध्ये लिफ्टमन नाहीत, त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही, त्यामुळे त्वरीत लिफ्टमनची नेमणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित लिफ्टमन नाही घेतल्यास शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.












