कर्वेनगरमध्ये बेशिस्त दुचाकीस्वाराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : पुणे शहरात कर्वेनगर परिसरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेशिस्त पद्धतीने अतिशय वेगाने गाड्या चालवल्या जातात.हा बेशिस्त पणा एका महिलेच्या जीवावर बेतला असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून युवकावर कारवाई करण्यात आली आहे.
हिंगणे होम कॉलनी मध्ये बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या व सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न मधून आवाज काढणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशी करत आहेत.

कर्वेनगर मधील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या बरोबर समोर श्रीकृष्ण मित्र मंडळाचे कार्यकर्ते समीर वसवे यांच्या आई रंजना प्रकाश वसवे यांचे नुकतंच एका दुचाकीने उडवल्यामुळे निधन झाले. कर्वेनगर परिसरात रंजना वसवे या रस्ता ओलांडत असताना समोर भरधाव वेगात येणाऱ्या एका दुचाकी चालकाने त्यांना उडवले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या अनेक तरुण वेगाने, बेशिस्त पद्धतीने गाड्या चालवत आहेत, जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आहेत, बुलेटच्या सायलेन्सर मधनं फटाकडे वाजवत आहेत, गाड्या रेस करत आहेत ,या सगळ्याचा परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास होत आहे , याच्यावर उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, अशा वाहन चालकांवर त्वरित कारवाई करणे फार गरजेचे आहे.






