पुणे महापालिकेची निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता; वेळेअभावी प्रभाग रचना बदलाची शक्यता धूसर

पुणे: राज्यात नुकताच सत्ता बदल झाला आहे. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र हि शक्यता कमी असून पुण्यासह अनेक महापालिकांच्या प्रशासकाची मुदत सप्टेंबर मध्ये संपणार असून सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणूक घेण्याचा आदेश दिलेला असल्याने आगामी पुणे, पिंपरी चिंचवड सह महापालिका सार्वत्रिक निवडणूका ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येच होतील. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर केंव्हाही निवडणूका जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील १८ महापालिका तसेच
जिल्हा परिषद, नगरपंचायती, नगरपरिषदांच्या निवडणूका लांबल्या आहेत. जवळपास सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. अशातच नुकतेच राज्यात सत्ता बदल झाल्याने यापुर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुकांचा निर्णय बदलण्यात येईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने वेळेत निवडणूका व्हाव्यात यासाठी प्रक्रिया यापुर्वीच सुरू केली आहे. जवळपास सर्वच ठिकाणची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार याद्या देखिल जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्याने या याद्या अंतिम होण्यास काही अवधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतू सर्वच ठिकाणी असलेल्या प्रशासकांचा कालावधी तसेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात दिलेली मुदत सप्टेंबर अखेर संपत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना बदला पासून सर्व गोष्टी पुन्हा नव्याने करायच्या झाल्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.



यानंतर निवडणुकांची घोषणा होउन दीड महिना आचारसंहिता लागू करावी लागेल. हा कालावधी फार मोठा असून यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन देखिल संपून जाणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वाधीक पावसाचे जिल्हा अर्थात मुंबई, ठाणे व कोकण विभाग वगळता उर्वरीत ठिकाणी निवडणूक घेण्यात कुठलीच अडचण नसल्याचे मत निवडणूक आयोगाचे आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करता मुंबई, ठाणे,कोकण वगळता उर्वरीत ठिकाणी सप्टेंबरमध्येच निवडणूका होतील, असा विश्वास प्रशासनातील अधिकारी व्यक्त करत आहेत.



