शैला यादव व झीशान कासकर यांना दिला जाणार ‘कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार-२०२३’

पुणे : समाजातील वंचित घटकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे म्हणून काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला/कार्यकर्तीला देण्यात येणारा ‘कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार’ २०२३ सालासाठी सातारा औंध येथील शैला यादव, व चिपळूण येथील झीशान कासकर, या दोन युवा कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे.
जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मानचिन्ह, सन्मान-पत्र व २५,००० रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘श्रमिक’ भवन, स्टेशन रस्ता, शिवाजी नगर, पुणे-५ इथे पार पडणार आहे.

या युवा कार्यकर्त्यांच्या कामाचे समाजाने मोल जाणावे, या कामाची व्यापक पातळीवर माहिती व्हावी व तरुण-तरुणींना स्फूर्ती मिळावी असा हेतू हा पुरस्कारामागे असल्याचे ‘कॉ. अशोक मनोहर मित्र परिवार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.









