पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ हवे- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : जोरदार पावसामध्ये पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तीव्र होण्याची शक्यता असल्याने यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी आणि त्यावर तातडीने डागडुजी करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नेमून या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची आणि यासाठी ‘टोल फ्री क्रमांक’ सुरु करुन त्यास WhatsApp द्वारे जोडावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाव्दारे केली आहे.
मानकर म्हणाले, पुणे शहरात पावसाची म्हणावी तितकी सुरुवात झाली नाही, परंतु नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता जोरदार पाऊस झाला तर, या खड्ड्यांचे स्वरूप आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना, छोट्या व्यवसायिकांना रहदारीस अडथळा येतो. तसेच पाऊस झाल्यावर शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणत पाणी साचत असून त्याच्या फटका नागरिकांना बसतो.

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठीचे पत्र दिले आणि त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली. शिवाय रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी आणि त्यावर तातडीने डागडुजी करण्यासाठी एखादे पथक अर्थात ‘टास्क फोर्स’ नेमून या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची आणि यासाठी ‘टोल फ्री क्रमांक’ सुरु करुन त्यास WhatsApp द्वारे जोडल्यास नागरिकांना संपर्क साधणे सहज शक्य होईल. अशी सोय करण्याची देखील विनंती केली.












