पुणे शहर

कर्वेनगरमध्ये राड्यारोड्यामुळे निर्माण होणाऱ्या बकालपणाला जबाबदार कोण ?

पुणे : कर्वेनगरच्या मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ  रस्त्याच्या कडेने मोठ्याप्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. या राडारोड्यामुळे कर्वेनगरच्या मुख्य रस्त्याच्या कडेने बकालपणा निर्माण झाला असून या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

रस्त्याच्या कडेने एवढ्या मोठ्या प्रमाणात राडारोडा पडत असताना देखील प्रशासन कोणतीच भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नगरसेवकही याकडे लक्ष देत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

कर्वेनगर मधील साई बाबा मंदिर शेजारी असणारी मोकळी जागा ही केंद्र शासनाकडून एका सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात आली आहे.  ही जागा गेले अनेक दिवस रिकामी असल्याने मुले ती खेळण्यासाठी वापरत होती. मात्र आता रस्त्याच्या कडेने व त्याबरोबरच या संस्थेच्या मोकळ्या जागेवरती ही  राडारोडा टाकला जात आहे.

Img 20220121 wa0161

तसेच वनदेवी मंदिराकडून श्रमिक वसाहतीकडे रस्त्याच्या कडेने ही राडारोडा टाकून सपाटीकरण चालू आहे. याठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने लावण्यासाठी पार्किंगची जागा केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.  त्यामुळे या प्रकाराकडे महापालिका प्रशासन केव्हा लक्ष देणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या मोकळ्या जागेवर व रस्त्याच्या कडेने पडत असलेल्या राड्यारोड्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असून लागून असलेल्या वस्ती विभागातील नागरिकांच्या घरांमध्ये साप निघू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

या संदर्भात वारजे कर्वेनगर क्षत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त गुर्रम यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेने व पदपथावर पडलेला राडारोडा उचलण्यात येणार असून त्याठिकाणी पुन्हा राडारोडा पडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल तसेच श्रमिक वसाहती कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने पदपथावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर व बेकायदेशीर गोष्टींवर कारवाई करण्यात येईल व त्याबाबत सूचनांचे फलक लावण्यात येतील.

Img 20220119 wa0206

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये