कोथरुड

टेकडीवरील एमआयटी च्या कामाला नागरिकांचा वाढता विरोध

कोथरुड : कोथरूडमधील श्रीराम हाईट्स, वैदेही, सुफल सोसायटीमागील बाजूच्या डोंगर उतारावर एमआयटी संस्थेकडून खोदकाम, वृक्षतोड, कच्चा रस्ताबांधणी, मुरुम, माती डम्पिंग अशी कामे केली जात असल्याने त्याला सोसायटीतील नागरिकांकडून विरोध करण्यात आला आहे.

एमआयटी कॉलेज रस्त्याला असणाऱ्या श्रीराम हाईट्स, वैदेही, सुफल या सोसायट्यांमागील डोंगरावर गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. डोंगर उकरून रस्ता करणे, झाडे तोडणे असे प्रकार राजरोस सुरू असल्याचे सोसायटीच्या वतीने महापालिकेला दिलेल्या तक्रार पत्रात सांगण्यात आले आहे. कशा प्रकारे रात्रीच्या वेळी व सुट्टीच्या दिवशी कामे चालतात याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.  या डोंगरावर असणाऱ्या पायवाटेचा  मोठा रस्ता तयार करण्यात येत आहे. हा रस्ता झाल्यास येथील हिरवाई , शांतता नष्ट होणार आहे तसेच मोर, ससा अशा वन्य जीवांना त्रास होणार असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे. आता या प्रकारामुळे वेताळ टेकडी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे हर्षवर्धन मानकर यांनी महापालिका अधिकारी, सोसायटीतील नागरिक यांच्यासह या चालू असलेल्या कामाची पाहणी केली आहे. याबाबत मानकर यांनी सांगितले की,  स्थानिक रहिवाशांना कामांबाबत आक्षेप असून रहिवाशांकडून महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कोरोना संसर्ग काळात कारवाई करण्यास महापालिकेतील अधिकारी असमर्थता दर्शवित होते. म्हणूनच जन आंदोलन करणार्‍या स्थानिक रहिवाशांची अधिकार्‍यांसमवेत भेट घेतली. यानंतर एमआयटी संस्थेला रीतसर नोटीस बजावली आहे. या सर्व विषयात स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

याबाबत स्थानिक नागरिक अनिरुद्ध खांडेकर म्हणाले की, हील टॉप हील स्लोप मध्ये अशी कामे करता येत नाहीत. परंतु महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर पणे रात्री व सुट्टीच्या दिवशी कामे केली जात आहेत. या प्रकारामुळे सोसायट्यांमधील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अशा कामांमुळे सोसायट्यांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात असा काही प्रकार घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार आहे. पालिकेने आता काम थांबवले आहे पण कायमस्वरूपी यावर बंदी घालून कारवाई करण्यात यावी.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये