क्लीन हिल्स पुणे मोहिमेत सहभागी व्हा : वारजेतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचे पुणेकरांना आवाहन..

पुणे : pune city महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून टेकड्यांवरील पर्यावरण संवर्धनासाठी क्लीन हिल्स पुणे ही चांगली मोहीम हाती घेतली असून यातून महिन्याच्या पहिल्या शनीवारी टेकड्यांवरील पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनीही आपल्या जवळील टेकडीवर जाऊन महिन्याच्या पहिल्या शनीवारी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वारजे येथील संजीवन वन उद्यान या ठिकाणी क्लीन हिल्स पुणे या मोहिमेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली . यावेळी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, माजी नगरसेविका सायली वांजळे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, काका चव्हाण, सुरेश गुजर, वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांनी केले होते.
सुळे म्हणाल्या पुणे शहरात असलेल्या टेकड्या या पुण्याला लाभलेले वैभव आहे. पर्यावरण आणि पर्यटनाच्या दृष्टीने या टेकड्या महत्वपूर्ण आहेत म्हणूनच शासनाने या टेकड्यांवर पर्यावरण संवर्धन व्हावे व टेकड्यांवर स्वच्छ्ता ठेवून त्यांचे सौंदर्य जपले जावे यासाठी सुरू केलेली क्लीन हिल्स पुणे ही मोहीम महत्वाची भूमिका बजावणार आहे.
यावेळी वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक संघ, राजयोग प्रतिष्ठान, सम्राट मित्र मंडळ यांच्या वतीने रेणुकानगर येथे वृक्षारोपण व संवर्धन अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.




