कोथरुड

नाना पेठेतील आरक्षित जागेवर एसआरए करण्याचा घाट थांबवून त्या ठिकाणी वारकरी भवन उभारावे : धुमाळ

बाधित झोपडी धारकांचे योग्यरीत्या झोपडपट्टी पनर्वसन करण्यात यावे.

पुणे : नाना पेठेतील प्राथमिक शाळा व मैदानासाठी आरक्षित असलेली जमीन पुणे महापालिकेच्या ताब्यात असल्याची नोंद मालमत्ता पत्रकावर करण्यात आलेली आहे. असे असताना देखील या संपूर्ण जागेवर चुकीच्या पद्धतीने एसआरए करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे हा चुकीचा प्रकार तातडीने थांबवून निवडुंगा विठोबा मंदिराला लागून असलेल्या या पालिकेच्या आरक्षित जागेवर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वारकरी भवन उभारण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. तसेच येथील बाधित  झोपडी धारकांचे योग्यरीत्या झोपडपट्टी पनर्वसन करण्यात यावे असे ही त्यांनी म्हंटले आहे.

धुमाळ यांनी या संदर्भातील पत्र महापालिका आयुक्त व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.  महापालिकेची असलेली ही सदर जागा पुण्याचे वैभव निवडुंगा विठोबा मंदिराला लागून असून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी वास्तव्यास असते. तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी या परिसरात येते.  या मंदिर परिसरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात. या आरक्षित जागेवर पालिकेने वारकरी भवन उभा केल्यास त्याचा वारकरी संप्रदायास नक्कीच फायदा होणार असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे. परंतु सदर जागा ताब्यात घेऊन आरक्षणासाठी न वापरता पडून राहिल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जागेवर विकसकाने एसआरए योजनेअंतर्गत विकसित करण्यास चुकीच्या पद्धतीने मान्यता देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय, विधी विभाग, भुसंपादन, मालमत्ता व्यवस्थापन व बांधकाम विकास विभागाच्या निष्काळजीपणामुळे सदर जागा विकसकाच्या फायद्यासाठीच एसआरए योजनेस मंजुरी दिल्याचे दिसत आहे. सदर जागा ताब्यात आली तेव्हा ७० ते ८० चाळवजा घरे होती परंतु जास्त प्रमाणात झोपड्या दाखवून एसआरए योजनेस मदत केल्याचे दिसत आहे.  नियमानुसार ३.५ एकर मध्ये आवश्यक असणाऱ्या झोपड्या सदर ठिकाणी अस्तित्वात नसताना बेकायदेशीरपणे कारवाई चालू आहे. जे बाधित झोपडीधारक आहेत त्यांच्यासाठी योग्य रीतीने प्रकल्प राबवणे आवश्यक असताना पालिकेच्या आरक्षित संपूर्ण जागेचा वापर केला जात आहे.

सदरची जागा निवडुंगा विठोबा मंदिराला लागून असल्याने पुणे महानगरपालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प वारकरी भवन या ठिकाणी उभारता आले असते याबाबत स्थानिक सभासद व अन्य सभासदांनी लेखी मागणी केलेली आहे. दरवर्षी अर्थसंकल्पात या कामासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद उपलब्ध असते परंतु योग्य जागी अभावी गेले अनेक वर्ष सदर प्रकल्प मार्गी लागलेला नाही. समस्त वारकरी समाजाची फसवणूक पुणे महापालिका आतापर्यंत करत असलेली आहे.

सदर जागेत एसआरए योजना राबवून बिल्डरचा फायदा होण्यासाठी तसेच मालमत्ता पत्रकावर मनपाचे नाव असल्याने २५% नजराणा देऊन विकसित करण्यास मान्यता दिल्याचे समजते. यामुळे २५% नजराणा या कलमाचा चुकीचा वापर करून बिल्डरच्या फायद्यासाठी झोपडपट्टी नसून सुद्धा झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.  यामुळे पुणे महापालिकेची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणात मोठा भ्रष्टचार झाला असून या सार्‍यांनी बोगस झोपडपट्टी मनपाच्या अहवालानुसार केलेली आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे. 

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

जागेच्या मूळ मालकाने जमिनीचा मोबदला स्वीकारलेला असल्यामुळे मालकाचा जमिनीचे संबंध राहत नाही त्यामुळे मालक व मनपा यांनी मिळून विकासकास सदर जागा एस आर योजनेसाठी दिली गेली असे दाखवले गेले आहे.  ही बाब चुकीची आहे या मिळकतीवर विकसकाच्या हितासाठी बेकायदेशीरपणे झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली जात आहे. या प्रकाराला तातडीने स्थगिती देऊन या जागेवर वारकरी भवन उभरण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये