महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील जवान शहीद; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : आंबेगाव तालुक्यातील लौकी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलाचे जवान सुधीर पंढरीनाथ थोरात (वय ३३) यांचा रविवारी (१३ नोव्हेंबर) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह लौकी या गावी आणल्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी (१५ नोव्हेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जवान सुधीर थोरात यांच्या अंत्यविधीसाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.

Fb img 1647413711531 1

शहीद जवान सुधीर थोरात यांच्या मागे पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. गावातील अतिशय मनमिळावू स्वभावाचा तरुण अशी त्यांची ओळख होती. घरच्या अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत सुधीर थोरात हे सैन्यात भरती झाले होते. सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांच्यातील खेळाचे कौशल्य पाहून त्यांना घोडेस्वारी या खेळात सहभागी करण्यात आले होते. घोडेस्वारी या स्पर्धेत त्यांनी देशाला तसेच आपल्या तुकडीला अनेक पदके मिळवून दिली होती.

Img 20221012 192956 045 1

शहीन जवान सुधीर थोरात हे घोडेस्वारीच्या एका स्पर्धेसाठी ग्वाल्हेर येथे गेले होते. या ठिकाणी मैदानात सराव सुरू असताना वेगाने धावत असणाऱ्या एका घोड्याची थोरात यांना धडक बसली. तसेच घोड्याने त्यांना लाथ मारत जखमी केले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जवान सुधीर थोरात हे सैन्य दलातील नावाजलेले घोडेस्वार होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धेत बक्षीस मिळविले आहे. तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्यांनी विविध पदके मिळविली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये