उद्यापासून पुण्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : गेली काही दिवस पुण्यात पावसानं उघडीप घेतल्यानंतर, उद्यापासून पुन्हा एकदा पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या चार दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात चारही दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. पण आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आज दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आले आहेत. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे.









