डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू

पुणे : श्रीगोंदा येथील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेल्या शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक बाबुराव खंडागळे (वय 58) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कर्जतच्या कौडाणे गावात गेले होते. मात्र जयंतीनिमित्त सुरू असणाऱ्या डीजेच्या तीव्र आवाजाने त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते कोमात गेल्याची खबर डॉक्टरांनी दिल्याने त्यांच्या परिवारासोबतच शाळेतले सहकारी देखील चिंतातूर झाले होते. महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज सुरू होती. शनिवारी (दि. 6) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक खंडागळे यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यानिमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता.




