शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी ठरला संस्मरणीय.. वारजेतील पालिकेच्या पाटलू चौधरी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले वाटप
वारजे : वारजे येथील कै. ह.भ.प. रामचंद्र पाटलू चौधरी प्राथमिक विद्यालय म.न.पा. शाळा क्रमांक 205 बी शाळेतील प्रांगणात पहिले पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा, त्यांच्या मनातून शाळेविषयीची भीती जाऊन आपुलकीचे नाते निर्माण व्हावे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांनी विद्यार्थी व पालकही भारावून गेले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा फुलांच्या माळा व फुगे, पताका लाऊन तसेच रांगोळी काढून सजविण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करताच ढोल ताशाच्या गजरात माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व वृषाली चौधरी तसेच महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता शंकर दुदुसकर कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मुलाच्या शैक्षणिक जीवनाचा प्रारंभ आपल्या मनात साठवू पाहणारे पालक हा स्वागताचा व प्रवेशोत्सवाचा कौतुक सोहळा पाहत असताना अगदी भाराऊन गेले होते. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढताना व पंजाचे ठसे देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.



कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका प्रतिभा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. स्नेहा अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी अधिकाऱ्यांना माहिती दिली. वर्षा जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.












