महापालिकेची अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना वाचवण्याकरिता या दिवशी होणार भव्य मेळावा

पालिकेच्या मनमानी कारभारा विरोधात ठरणार पुढची दिशा
पुणे : पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणारी महापालिकेची अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना मेडिक्लेम कंपनीच्या हवाली देण्याचा प्रशासनाचा मनमानी निर्णय हाणून पाडण्याकरिता दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे आयोजन पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त व तिच्या सहयोगी संघटना असणाऱ्या पीएमसी एम्प्लॉईज युनियन, डॉक्टर असोसिएशन, अधिकारी व अभियंता संघ तसेच पुणे मनपा निवृत्ती सेवक संघ या सर्वांनी मिळून केले आहे. बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदीर, स्वारगेट पुणे येथे हा मेळावा पार पडणार आहे.
२१ ऑक्टोबर २०२२ रोजी स्थायी समितीच्या सभेत पुणे महानगरपालिकेतील कार्यरत सेवक तसेच निवृत्त सेवकांची सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना बंद करून त्या ऐवजी मेडिक्लेम कंपनीद्वारे ही योजना राबविण्याकरता दोन ब्रोकर कंपन्यांना मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. खरे तर सध्या पुणे महानगरपालिकेत आयुक्त हे प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत त्यांनी मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नये असे संकेत आहेत, परंतु हे सर्व बाजूला सारून ब्रोकर कंपनीची निवड करण्यात आल्याचा आरोप संघटना करत आहेत.

ब्रोकर नेमण्याबाबत मे महिन्यामध्ये ज्या वेळेला निविदा काढण्यात आल्या तेव्हापासून पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त व तिच्या सहयोगी संघटनांच्या वतीने आयुक्तांना समक्ष भेटून व लेखी निवेदन देऊन सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना हीच योग्य असून मेडिक्लेम कंपनीला जर ही योजना सुपूर्द केली तर उपचार खर्चाबाबत सतत अनिश्चितता राहील व पूर्ण खर्चही मिळणार नाही हे स्पष्ट केले. यावेळी मेडिक्लेम कंपनी नेमण्याचे धोरण रद्द करावे अशी मागणी करण्यात आली होती. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी याकरिता पुणे मनपा भवनावर निदर्शने कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. परंतु या सर्वांना न जुमानता महापालिका प्रशासनाने ब्रोकरच्या नेमणुकीला मान्यता दिली आहे. यामुळे कार्यरत तसेच सेवानिवृत्त सेवकांमध्ये तीव्र रोष निर्माण झालेला आहे. हे धोरण हाणून पाडण्याकरता पुढील लढ्याची कृती जाहीर करण्याकरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.









