कै.ज्ञानोबा दगडे पाटलांच्या अंतःकरणात दया,धर्म होता म्हणून हा किर्तनाचा सोहळा उभा राहिला – ह.भ.प. विशाल महाराज खोले

कै.ज्ञानोबा दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन महोत्सव
पुणे : ज्ञानोबा दगडे पाटलांच्या अंतःकरणात दया होती. धर्म होता. म्हणून हा सोहळा उभा राहिला. मी बापूसाहेब दगडे पाटील यांना मित्रांशी बोलताना ऐकले होते माझे तरी गावात चार जण विरोधक असतील मला वाईट म्हणत असतील पण माझ्या वडिलां विषयी सर्वांनाच कायम आदर आहे. त्यांना वाईट म्हणणारा माणूस मला भेटला नाही. याला जीवन म्हणतात असे मत प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी व्यक्त केले.
बावधन बुद्रुक मधील तलाठी कार्यालयासमोरील मैदानात या भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तन महोत्सवात बोलताना ह.भ.प. विशाल महाराज खोले म्हणाले, दया आणि धर्म जागा झाला की कृपा होते. तुमचे वडील अंध होते. अंध व्यक्तीची सेवा केली की, जगाचा मालक देखील ऋणी होतो. याचा खुप मोठा पुरावा आहे. आपल्या परंपरेत महाभारत काळात द्रौपदीने एका अंध साधूची मदत केली होती. आणि त्या साधूने आशीर्वाद दिला होता की तुला मदतीची गरज लागली तर साक्षात परमेश्वर येऊन तुझी मदत करेल आणि तसेच झाले.

आंधळ्या व्यक्तीची सेवा केली तर देव येतो. जसा द्रौपदी साठी धावून आला तसा देव धावून येतो. बापूसाहेब यांनी वडिलांची सेवा केली. त्यामूळे या सभामंडपात देव धावून आला आहे. आणि तो आपल्या सर्वांना सांगतोय असेच तुझ्या बापाला जीव लाव असेच प्रेम कर बाप आहे म्हणून आपले अस्तित्व आहे.
पायात रुतलेला काटा जसा डोळ्यांना रडवतो. तसे समाजातील दुःखे संताना रडवते. साधू हा दीन वत्सल असतो. वाटेत दिसणारा स्वैराचार, अत्याचार पाहून दुर्लक्ष करून साधू कधीही जाऊ शकत नाही. साधू गंगे प्रमाणे सर्वांना आनंद देत तृप्त करीत पुढे जात असतात.असेही खोले म्हणाले












