महाराष्ट्र

ईडी की घरगडी, सत्तेसाठी जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका : उध्दव ठाकरे

मुंबई : “केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार अत्यंत नीच आणि निंदनीय आहे. ज्या शिवसैनिकांनं 90 च्या दंगलीत आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदूंच्या बचावासाठी जीवाचं रान केलं. आज त्यांना तुम्ही त्रास देत आहात. मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो. त्यांना कशाला त्रास देता. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी जीव जळत असेल तर मी येतो तुम्ही मला तुरुंगात टाका”, असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाला संबोधित करताना म्हटलं आहे. भाजप नेत्यांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका त्यांनी केली. ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरुनही त्यांनी भाजपला घेरले.

“विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना एकाच वेळी उत्तर देणे शक्य नसले तरी याचा अर्थ असा नाही की त्यांनी मांडलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेणार नाही. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या पाहिजेत. एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घेऊ शकतात, पण राज्याची संस्कृती आहे प्रथा-परंपरा आहे. राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरु केल्यानंतर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. राज्यपाल काय बोलत आहेत ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होते. त्यावेळी केलेला दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले. राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ईडी की घरगडी?

“केंद्रीय यंत्रणा आज ज्यापद्धतीनं काम करत आहेत ते पाहता ही ईडी आहे की घरगडी तेच कळत नाही. मलिकांच्या संपत्तीवर टाच, देशमुखांच्या संपत्तीवर टाच. कुटुंबीयांची बदनामी करायची. हे अतिशय नीच आणि निंदनीय राजकारण आहे. टाचेला मी घाबरत नाही…खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवरही भाष्य केलं. 

“राज्यपालांनी माझे शासन समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करते असे राज्यपालांच्या भाषणात होते. पलीकडे राज्य ज्यांनी भाषण होऊ दिले नाही त्यांचे असल्यामुळे राज्यपालांना बोलू दिले नाही की काय हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोविडमध्ये ऑक्सिजनची कमी असताना तो कसा मिळवला, केंद्राने हजारो किलोमीटरवरुन ऑक्सिजन आणायला लावला हे राज्यपालांच्या अभिभाषणात होते. रिकामे टॅंकर एअरलिफ्ट करुन रस्त्याने, रेल्वेने ऑक्सिजन मागवण्यात आला. रात्रंदिवस आपल्या शासनाची यंत्रणा कार्यरत होती याचा मला मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. यंत्रणेतील लोकांना आपण कसे वागवतो त्याप्रमाणे ते काम करत असतात,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवभोजन थाळीतून १० रुपयांमध्ये जेवण देत आहोत ही अभिनाची गोष्ट आहे. गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात जेवण मिळवून देण्याचे मोठे काम आपण करत आहोत. काही लोक आरश्यात बघितली तरी भ्रष्टाचार झाल्याचे म्हणतात. कारण त्यांच्या मते तो आरसा बनवण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसतो,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

महाराष्ट्राची बदनामी करु नका

ज्यांसाठी हे करत होत ते या योजनांचा लाभ घेत आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत याचेसुद्धा मला समाधान आहे. माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये माझी उणिव न भासू देता सगळ्या मंत्र्यांनी उत्तम काम केले त्यांच्याबद्दलही मला समाधान व्यक्त करायचे आहे. जे झाले आहे ते झोलेले आहे आणि नाकारण्याचा नाकर्तेपणा कोणी करु नये. सुधीर मुनगंटीवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात. वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही तर सुपर मार्केटमध्ये मिळणार आहे. आपल्या बाजूला असलेल्या मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का?  देशात एक लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. हे पाहून आपल्या राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. आपण केलेला विकास राज्यपाल सांगत होते तो आपण समोर येऊ दिला नाही. याची दखल नागरिक घेत असतात. मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

रामानंतर आता दाऊदच्या नावानं मत मागणार का?

“दाऊदचा विषय सध्या खूप चघळला जात आहे. रामाच्या नावानं मतं मागून झाली. आता दाऊदच्या नावानं मत मागणार का? दाऊद नेमका आहे तरी कुठं हे काही तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेत ओबामानं कधी ओसामाच्या नावानं मतं मागितली होती का?”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

फडणवीसांना खरंतर ‘रॉ’मध्ये घेतलं पाहिजे

फडणवीसांना खरंतर ‘रॉ’मध्ये घेतलं पाहिजे. तिथं जे झटपट प्रकरणं सोडवतील. ज्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर तुम्ही आरोप करत आहात. त्यांना आज तुरुंगात टाकलं आहे. तेच मलिक आणि देशमुख तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर चालले असते ना?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये