राज ठाकरेंची भेट घेतल्यावर वसंत मोरेंनी दिली ही प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नाराज नगरसेवक वसंत मोरे यांनी मुंबईतील ‘शिवतिर्थ’वर जाऊन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना आपण या भेटीनंतर शंभर टक्के समाधानी आहोत असं त्यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांची ‘शिवतिर्थ’ येथे भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व बोलणं झालं असून म्हणजेच 12 एप्रिल रोजी होणाऱ्या ठाण्यातील सभेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असं राज ठाकरेंनी सांगितल्याची माहिती दिली.
“सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली आहे. तसेच पत्रकारांनी तुम्ही या भेटीनंतर समाधानी आहात का?, असा प्रश्न विचारला असता, मोरेंनी, “मी 100 टक्के समाधानी आहे,” असं सांगितलं. “मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील,” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
“ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्यात का?”, असा प्रश्न मोरेंना विचारण्यात आला. त्यावर, “उद्याची उत्तर सभा आहे उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तरं देतील,” एवढं मोजकं उत्तर मोरेंनी दिलं. तसेच, “बाकी जे बोलायचं आहे ते राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार आहेत,” असंही मोरे यांनी सांगितलं.




