वारजेतील तपोधाम परिसरात शिरले मुठा नदीचे पाणी ; नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

वारजे : पुणे शहरात आणि परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने खडकवासला धरण भरले आहे. धरणातून तब्बल पस्तीस ते चाळीस हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने वारजे भागातील तपोधाम परिसरातील नागरी वस्तीमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागात सकाळपासूनच मदत कार्य सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नाईकल व अधिकाऱ्यांनी तपोधाम मधील परिस्थितीची दुधाने यांच्यासह पाहणी केली.







दुधाने म्हणाले, नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच MSEB चे सर्व विजेचे डीपी पाण्याखाली गेल्याने धोका असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विजप्रवाह खंडित करून खबरदारी घेण्यात आली आहे.



पाण्याची पातळी आणि पावसाचा जोर वाढतच असल्याने नागरिकांना सुरक्षेचा ईशारा देण्यात आला आहे. आमच्यापरीने नागरिकांना सहाय्य करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी याप्रसंगी सावधानता ठेवत प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि कोणाच्याही जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची काळजा घ्यावी, असे अवाहन दुधाने यांनी केले आहे.









