
अमोल साबळे
पुणे : भाजप पुणे शहर कार्यकारणी मध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सध्या हालचाली सुरू आहेत. नुकतीच भाजप पुणे शहर अध्यक्ष पदी माजी नगरसेवक धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन अध्यक्ष झाल्यानंतर पक्ष कार्यकारणीत बदल होत असतात त्यानुसार आता0 कार्यकर्त्यांमध्येही आपल्याला हवे असलेले पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नवीन शहर अध्यक्षांची निवड झाल्यामुळे मतदार संघाच्या अध्यक्षांमध्येही बदल केले जाणार आहेत. कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पदासाठी प्रमुख कार्यकर्ते इच्छुक झाले आहेत. कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला त्यामुळे प्रत्येकवेळी येथील अध्यक्ष बदलत असताना इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहायला मिळत आली आहे. त्यामुळे यावेळी कोथरूड मतदार संघाच्या अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणारा हे पहावे लागणार आहे.
सध्या पुनीत जोशी हे भाजप कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष आहेत तर नवीन अध्यक्ष पदाच्या यादीत निलेश कोंढाळकर, विठ्ठल बराटे, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, गिरीश भेलके,अमोल डांगे अशी नावे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. या इच्छुक पदाधिकाऱ्यांपैकी कोण नवीन अध्यक्ष होणार की पुनीत जोशी हेच अध्यक्ष म्हणून रिपीट होणार, का एखादे वेगळे नाव पुढे येणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्की होईल.
पालकमंत्री व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ असे भाजपचे दोन नेते कोथरूड मध्ये आहेत. हे दोघे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पहावे लागणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दांडगा संपर्क व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याची कुवत असणाऱ्यालाच हे पद दिले जाईल अशी चर्चा आहे.



