पुणे शहर

डाव्यांची सत्ता असलेल्या देशात तरुण देशकार्य करतात, भारतात उत्सव-जयंत्या : डॉ. सूरज एंगडे

पुणे : ‘जगभरात कम्युनिस्ट सत्ता असलेल्या देशांमध्ये १८, १९ वयाचे तरुण देशकार्यासाठी काम करतात; पण भारतातले तरुण याच वयात उत्सव, जयंती साजरे करीत बसतात. याचा विचार तरुणांनीच करायला हवा,’ असे मत आंबेडकरी चळवळीतील युवा अभ्यासक डॉ. सूरज एंगडे यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. एंगडे यांनी लिहिलेल्या ‘कास्ट मॅटर्स’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. या निमित्ताने मेहता पब्लिशिंग हाउसच्या ग्रंथदालनात ‘थेट भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. एंगडे यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधला.

डॉ. एंगडे म्हणाले,‘सण उत्सवाच्या काळात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. राज्यातील तरुणांनी एक दिवस गणेशोत्सव साजरा करून नऊ दिवस सरकार पोहचले नाही, अशा ठिकाणी जाऊन रस्ते, पूल, शाळा, दवाखाने उभारणे आणि या पायाभूत सार्वजनिक सोयी सक्षम करण्याचे काम करावे. गणेशभक्तांनी हे गणेशाच्या नावानेच करावे. पण, विधायक कामे केली पाहिजेत’

‘कोणत्याही विचारांशी संबंधित चळवळ जिवंत ठेवायची असेल, तर तरुणांना त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. किनाऱ्यावर बसून दुसऱ्याला नाव चालवण्याची सूचना देणारे मूर्ख असतात. चळवळीचेही तसेच आहे. बाहेर राहून केवळ चर्चा करून चळवळ सक्षम होणार नाही. त्यात तरुणांना उतरावे लागेल. कॉर्पोरेटपासून कोणत्याही क्षेत्रातील जातीयवाद संपवण्यासाठी बहुजनांना उच्चपदापर्यंत पोहोचावे लागेल. त्यासाठी बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करून आपले स्थान तरुणांनी निर्माण करावे,’ अशी सूचनाही एंगडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये