पुण्यात राष्ट्रवादीचे महागाई विरोधात अनोखे भोंगा आंदोलन; ऐकवली नरेंद्र मोदींची इंधन दरवाढीवरील भाषणं..

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत पेट्रोल-डिझेल दरवाढी बाबत भाषणे केली होती. हीच भाषणे पुण्यातील गुडलक चौकात भोंग्यावर लावत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून सतत इंधन दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा सातपुते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रीती धोत्रे, श्वेता मिस्त्री, हार्दिका ओहाळ, मृणाल ओहाळ, पुनम धोत्रे तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “२०१४ मध्ये पेट्रोल ६० आणि गॅसची टाकी ४०० रुपयांच्या आसपास होती. आता हेच सात वर्षात दरवाढ होत होत पेट्रोल १२० आणि गॅस हजाराच्या घरात गेला आहे. यामुळे आता कसं जगायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी अनेक सभा घेत महागाईवर भाषणं केली होती पण आता त्यांना आणि भाजप समर्थकांना महागाईचा विसर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज भोंग्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पेट्रोल-डिझेल वरील भाषण लावून आंदोलन करीत आहोत,” अशी भूमिका जगताप यांनी मांडली.







